salman1

सिनेमातले नट- नट्या राजकारणात येणे हे काही गैर नाही. ते येऊन काम करतात का नाही, तो वेगळा मुद्दा आहे. पण यातून एक नवीनच “खूळ” आलं, ते म्हणजे निवडणूक प्रचारासाठी “नट- नट्या” बोलवणं. मला या मागचा हेतूच कळत नाही. एक उघड-उघड सत्य आहे की, जे नट- नट्या येतात त्यांना अमाप पैसा मिळतो. म्हणून “ते” का येतात हे आपण समजू शकतो.

आत्ता प्रश्न आहे तो उमेदवार त्यांना का बोलवतात? मला तर वाटत की आपली “पोहोच” दाखवण्यासाठी आणि गर्दी गोळा करायला. थोडक्यात “हवा” करायला. आजच संभाजीनगर मध्ये सलमान खान चा रोड्शो झाला, त्याला आणणारे होते कॉंग्रेसचे राजेंद्र दर्डा. शो तर काही झाला नाही, लोकांनी मात्र चांगला लाठी मार खाल्ला, सार्वजनिक मालम्तेच नुकसान झालं आणि आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेल्या “सामान्य” माणसाला एक नवा ताप.

ठीक आहे! झालं ते वाईट झालं. यातून काही शिकतील असं म्हणावं तर “सलमानराव” लगेच थेट सोलापूर च्या वाटेवर. इथे उमेदवार होत्या प्रणिती शिंदे, या आहेत माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या. बरं सलमान कमी की काय म्हणून इथे रितेश देशमुखांची भर. मग होणार तेच झालं “राडा”. इथे तर परिस्थिती एवढी हाता बाहेर गेली की रोड्शो आणि सभा दोनीही रद्द. वर चाहत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलीस हतबल, मग गर्दीवर लाठीमार, त्यात लहान, मोठे,महिला, पुरुष सगळ्यांना एकच न्याय, दे दणादण!.

बरं एवढा सगळा खटाटोप केला. पण खरच या भाडोत्री गर्दीच रुपांतर मता मध्ये होत का? हा आहे मूळ प्रश्न. खरंच आमक्या उमेदवाराने अमुक नट- नट्या आणल्या, आणि त्या मुळे तो जिंकला, असं माझ्या तरी माहितीत नाही. जनता नट- नट्या पाहून कधीच मतदान करणार नाही आणि असं झालं तर ते फक्त “दुर्दैव्य”.

अजून एक महत्वाचा मुद्दा. या नट- नट्या ज्याकोणासाठी प्रचारात उत्तरतात, ते खरंच त्या उमेदवाराला ओळखतात का?. आपण ज्या व्यक्तीचा प्रचार करत आहोत, ते योग्य आहे का? या सगळ्याची तपासणी केल्या खेरीच प्रचार करणे हा केवळ नट- नट्या यांचा वैयक्तिक निर्णय आहे. शेवटी चांगला उमेदवार निवडून देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

मला तर वाटतं, कसला आलाय “जलवा”. मूर्ख-भेकड कुठचे, स्वताहात धमक नाही, स्वताच कार्य नाही …म्हणून नट लागतात यांना प्रचाराला.

– जय महाराष्ट्र!

Advertisements